Tuesday, 29 November 2016

वाफगावची होळकरांची गढी



वाफगावची होळकरांची गढी  

            स्वराज्याचे आधारस्तंभ सरदार होळकर यांची वाफगावची गढी हा जणू एक भुईकोटच आहे.गावात प्रवेश करताच या गढीचे भक्कम तट दिसू लागतात. या गढीला वेळ नदी आणि एका ओढ्याच्या संगमावर बांधण्यात आलंय.त्यामुळे तीन बाजू नैसर्गिकरित्या संरक्षित आहेत.
        मल्हारराव होळकर वाफगावला पूर्वीपासून राहत होते,तिथं त्यांचा जुना वाडा असावा,नंतरच्या काळात यशवंतराव होळकरांनी १७६७ च्या आसपास हि गढी बांधली.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे वास्तव्य असल्याने या गढीला ऐतिहासिकदृष्ट्या अधिक महत्व येते.


गढीची सध्यस्थिती :

                  चौरस आकार, चारही कोपऱ्यात भक्कम बुरुज तसेच उत्तर बाजूस मुख्य दरवाजा आणि २बुरुज आहेत. मुख्य प्रवेशद्वाराचे लाकडी दरवाजे आणि गजखिळे अजूनही भक्कम आणि शाबूत आहेत.उत्तरेकडे तोंड असलेल्या याच दरवाज्यातून कित्येक स्वाऱ्यांसाठी होळकरांची घोडी भरदाव वेगाने बाहेर पडली असतील.दरवज्यातून प्रवेश करताच समोर चुन्याच्या घाणीचे चाक तर उजव्या हातास एका चौथऱ्यावर समाधी आहेत,डाव्या बाजूस म्हणजे पूर्वेच्या बुरुजाखाली एक अंधारबाव नामक विहीर आहे.जवळच एका मोकळ्या जागेत तोफा ठेवलेल्या आहेत.एक चौकोनी विहीर आणि विष्णुमंदिर आहे.






गढीचा मुख्य दरवाजा
 

        गढीच्या मधल्या भागात लाकडी महिरपी,वीटकामाचे सुंदर सज्जे असलेले महाल आहेत.सध्या महालाच्या ईमारतीमधे रयत शिक्षण संस्थेची शाळा आणि शिक्षक कक्ष आहेत. इथून गढीच्या दक्षिण भागात गेल्यावर भव्य प्रांगण आणि चोहोबाजूने उंच भिंती दिसतात.या जागेत सध्या शाळेचे क्रीडांगण आहे.दरबार बहुदा याच भागात भरत असावा.या प्रांगणाच्या दक्षिणेला वर जाण्यासाठी जीने आहेत,दुसऱ्या मजल्यावर सुंदर कमानीयुक्त गच्ची आहे.उत्तरेच्या भिंतीवर अजूनही चुनेगच्ची पद्धतीची कलात्मक नक्षी शिल्लक आहे, नक्षीमध्ये चिन्हे आणि पुसटसे हत्ती आणि बैल दिसून येतात.पश्चिमेच्या भागात सिंहासनाची जागा असावी मुख्य चौथरा दिसून येतो. 





दरबाराचे मैदान


        
     या प्रांगणाकडे जाणारा एक वेगळा दरवाजा आणि जवळच धान्यकोठारही आहे. गढीच्या तटावरून फेरफटका मरायचे झाल्यास ठिकठिकाणी तटांवर चढणारे जीने आहेत.तटावरून पूर्वेच्या दिशेला वेळ नदीचे पात्र दिसते.तसेच पूर्व आणि पश्चिम तटात दिंडी दरवाजे आहेत.



दरबाराचे प्रवेशद्वार






    
राजेश्वर मंदिर शिखर
 राजराजेश्वर मंदिर :








मुख्य गढीच्या बाहेर उत्तरेस एक सुंदर शिवमंदिर आहे. इथले पुजारी दीक्षित समोरच्या वाड्यात राहतात. त्यांच्या माहितीनुसार हे मंदिर अहिल्याबाईंनी बांधले.मंदिराचे शिखर खास माळवा पद्धतीचे चुनेगच्चीयुक्त आहे. नंदीमंडप सभामंडप गर्भगृह अशी रचना आहे.बाजूच्या चौथऱ्यावर धर्मशाळा होती.मंदिराच्या गाभार्यात पूजेच्या पुरातन वस्तू आजही वापरात आहेत. एका कलशावर 'तुकोजी होळ' अशी अक्षरे दिसतात.एक नक्षीदार घंटी आणि शिसवी पेटी आहे.या मंदिराच्या गाभार्याच्या दरवाजाला वेगळीच म्हणजे सध्याच्या लॅच पद्धतीचे असते तशी कुलुपी पद्धत आहे. दरवाजा लोटून घेताच आतून कडी लागते. आणि एका लांब चपट्या किल्लीनेच ते उघडता येते.        


मंदिर प्रवेश

  इतर वास्तू : 



       वाफगाव मधून फिरत असताना अनेक जुन्या वास्तू आणि अवशेष दिसतात. पूर्वी गावाला तटबंदी असावी. मुख्य वेस आणि दरवाजा अजूनही उभा आहे, या वेशीच्या दरवाज्यावर शरभ चिन्हे आहेत. गावाच्या पूर्वेस नदीच्या पात्रात एक दगडी हौद आहे, नदीच्या पलीकडे चिंचेचा मळा आहे या भागात एक सुंदर कमानीयुक्त विहीर आहे.


गढीचा कच्चा नकाशा
         वाफगाव इथली गढी,मंदिरे,नदी,हिरवीगार शेती हे सगळंच तसं अपरिचित असलं तरी इथल्या भेटीत काही वर्षांपूर्वी आलेल्या पकपक -पकाक या चित्रपटामुळे इथले मंदिर आणि कमानीयुक्त विहीर मात्र तुम्हाला नक्कीच ओळखीची वाटेल.राजगुरूनगर पासून गुळानी मार्गे वाफगाव १५ किलोमीटर आहे.